Friday , November 6 2026
Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे प्रेमसंबंध; प्रेयसीची गळा आवळून हत्या

Spread the love

 

गोकाक धबधब्याजवळील डोंगर उतारावरील काटेरी झुडपांत मृतदेह फेकला; प्रियकरावर खुनाचा आरोप

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे प्रेमसंबंध ठेवले. मात्र, लग्न करण्याचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात प्रेयसीला मारहाण करून गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह गोकाक धबधब्याजवळील डोंगर उतारावरील काटेरी झुडपांत फेकून दिल्याचा आरोप प्रियकरावर करण्यात आला आहे.

रक्षिता सारिकर (वय २५, रा. हारुगेरी, ता. रायबाग) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून बसाप्पा सिद्धाप्पा सातन्नवर (रा. अडळहट्टी, ता. अथणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसाप्पा याने रक्षिताला लग्नाचे आश्वासन देत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले होते. मात्र, तो वारंवार लग्नाचा विषय पुढे ढकलत होता. त्यामुळे २८ ऑक्टोबर रोजी त्याने रक्षिताला हारुगेरी येथून गोकाक धबधब्याजवळ फिरायला आणले.

सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास धबधब्याच्या रस्त्यालगत असलेल्या कठड्यावर दोघे बसून बोलत असताना रक्षिताने चार वर्षांपासून लग्नाचे आश्वासन देऊनही आता लग्न का करत नाहीस, असा जाब विचारला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

या वादातून संतप्त झालेल्या बसाप्पाने रक्षिताच्या गालावर जोरात मारहाण केली. त्यानंतर हाताने तिचा गळा दाबून आणि ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह गोकाक धबधब्याजवळील डोंगराच्या उतारावरील काटेरी झुडपांमध्ये फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *