



दोन महिला आणि एका युवकाचा समावेश; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू
बेळगाव : खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत प्रवेश करून दोन महिला आणि एका युवकाच्या त्रिकुटाने तब्बल २ लाख ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना खडेबाजार येथील प्रसिद्ध पोतदार ब्रदर्स ज्वेलर्समध्ये घडली. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही घटना घडली असून, याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी सर्वेश संजय पोतदार यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान दोन महिला आणि एक युवक पोतदार ब्रदर्स ज्वेलर्स या सराफी पेढीत आले. सुरुवातीला त्यांनी कर्मचाऱ्यांकडे कानातील दागिने दाखविण्याची मागणी केली. त्यानंतर मंगळसूत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली. कर्मचारी दागिने दाखविण्यात व्यस्त असल्याची संधी साधत त्रिकुटातील एका महिलेने सुमारे २० ग्रॅम वजनाचे आणि २ लाख ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हातोहात लंपास केले.
काही वेळानंतर मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. मात्र, तोपर्यंत तिघेही तेथून पसार झाले होते. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक महांतेश धामणनावर व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. पेढीतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, यापूर्वीही शहरातील विविध सराफी पेढ्यांमध्ये खरेदीच्या बहाण्याने दागिने लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा दोन महिला आणि एका युवकाच्या टोळीने प्रसिद्ध सराफी पेढीला लक्ष्य केल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांच्या वेशात येऊन कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करीत दागिने पळविण्याची ही पद्धत पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta