



वेदांत फाउंडेशन आणि श्री ऑर्थो ट्रॉमा सेंटरचा उपक्रम; १५० नागरिकांची आरोग्य तपासणी
बेळगाव : निरोगी शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक परिस्थितीमुळे काहीजण वेळेवर उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे आजाराचे वेळीच निदान होणे आणि योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रोगाचे वेळेवर निदान झाल्यास त्यावर उपचार करणे अधिक सोपे होते, असे मत डॉ. गणपत पाटील यांनी व्यक्त केले.
वेदांत फाउंडेशनतर्फे श्री ऑर्थो ट्रॉमा सेंटरच्या सहकार्याने खानापूर तालुक्यातील मोरब गवळीवाडा येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भुजंग गावडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शोभा पाटील, क्लस्टर प्रमुख महेश पाटील आणि सुवर्णा माणगावकर उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांची हाडांची ठिसूळता व हाडांशी संबंधित वेदनांची तपासणी, रक्त तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक औषधांचे मोफत वितरणही करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील सुमारे १५० नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वेदांत फाउंडेशनचे गाव शाखाध्यक्ष बाबू येडगे, उपाध्यक्ष गांगाराम पाटील, काळू थोरवत, विठ्ठल बाजारी, बंम्माजी झोरे आणि बम्मू धनगर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजू पाटील यांनी केले, तर एम. एस. पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta