



१ लाख ४० हजार रुपये किमतीच्या दोन म्हशी हस्तगत; शेतकऱ्याला दिलासा
खानापूर : तालुक्यातील ओलमणी येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरीला गेलेल्या दोन म्हशींचा शोध लावण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी हस्तगत करून मूळ मालकाच्या स्वाधीन केल्या आहेत. सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे पशुधन परत मिळाल्याने शेतकरी परशराम महादेव पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ओलमणी येथील शेतकरी परशराम पवार यांची जांबोटी-खानापूर रस्त्यालगत सर्व्हे क्रमांक २५३ मध्ये शेतजमीन आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून दुग्धव्यवसाय आणि घरगुती वापरासाठी शेतात एक गाय व चार म्हशी पाळत होते.
२३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ते २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शेतात बांधलेल्या चार म्हशींपैकी दोन म्हशी चोरून नेल्या. याप्रकरणी पवार यांनी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी भीमाप्पा अडिवेप्पा पुजेरी (वय ३४, रा. करवी), भरमाप्पा रमेश पुजेरी (वय २२, रा. भरमणट्टी) आणि यल्लाप्पा सत्त्याप्पा गुंडलगुप्पी (वय १९, रा. हुल्यानूर, पोस्ट आष्टे) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस निरीक्षक एल. एच. गोवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सिद्रामप्पा उन्नद, हेड कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी, यलिगार, बसवराज तंगोजी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुरेश इरगार, सिद्राम हसरे आणि सुनील शिरगुप्पी यांनी ही कारवाई केली.
चोरीला गेलेले पशुधन पुन्हा मिळवून दिल्याबद्दल शेतकरी परशराम पवार यांनी खानापूर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta