



५ नोव्हेंबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू; पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांचा आदेश
बेळगाव : ऊसदरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी ४ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.
ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांतर्गत जेल भरो आंदोलनाचे आवाहन करण्यात आले असून, आंदोलक शेतकरी हिंडलगा कारागृहाकडे कूच करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चन्नम्मा चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. चन्नम्मा चौक हा शहरातील महत्त्वाचा आणि अत्यंत वर्दळीचा वाहतूक केंद्रबिंदू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या खडेबाजार उपविभागातील खडेबाजार, कॅम्प, टिळकवाडी आणि उद्यमबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा आदेश लागू राहणार आहे.
याशिवाय मार्केट उपविभागातील मार्केट, माळमारुती, शहापूर आणि एपीएमसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीसह बेळगाव ग्रामीण उपविभागातील बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta