



कारखानदार आणि शेतकरी नेत्यांची सहमती
बेळगाव : ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी प्रतिटन उसाला ३,६०० रुपये दर देण्यास सहमती दर्शविल्याची घोषणा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. शेतकरी नेते चूनाप्पा पुजारी आणि शशिकांत गुरूजी यांनीही या दराला संमती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी यांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र, ३,६०० रुपयांचा दर केवळ बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांना लागू राहणार असून, इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक परिस्थितीनुसार दर निश्चित केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
साखर कारखाने सुरू होण्यासाठी शेतकरी नेते आणि आंदोलकांनी सहकार्य करावे. कारखाने सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच गुरुवारी आयोजित करण्यात आलेले जेल भरो आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी
दरम्यान, शेतकऱ्यांनी गुरुवारी पुकारलेल्या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून, पदयात्रेला बेळगाव शहरात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ३,६०० रुपयांचा दर जाहीर करण्यात आला असला, तरी शेतकरी संघटना जेल भरो आंदोलनावर ठाम राहणार की आंदोलन मागे घेणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta