Friday , November 6 2026
Breaking News

चून्नाप्पा पुजारींसह शेकडो ऊस उत्पादक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात!

Spread the love

 

मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांत जोरदार वादावादी; जैन आंदोलनाला पोलिसांचा अडथळा

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या हिंडलगा जेल भरो आंदोलनाला पोलिसांनी अटकाव केला. भुतरामनहट्टी येथील मुक्तिमठ परिसरात शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

शेतकरी नेते चून्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिमठ ते हिंडलगा कारागृहापर्यंत पदयात्रा काढून जेल भरो आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, बेळगाव शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने पोलिसांनी मुक्तिमठ परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पदयात्रा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे चून्नाप्पा पुजारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पुजारी यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी उसाला प्रतिटन अतिरिक्त एक हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणून आंदोलन थांबणार नाही. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलन सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अनाथाश्रमातील मुलांना नवीन कपड्यांचे वाटप

Spread the love    बेळगाव : दिवाळीच्या मंगलमय सणानिमित्त रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या सदस्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *