Friday , November 6 2026
Breaking News

दूध दरवाढ आणि बस भाडेवाढीवरून डॉ. सोनाली सरनोबत यांची काँग्रेस सरकारवर टीका

Spread the love

 

दरवाढीचे निर्णय मागे घेण्याची मागणी

बेळगाव : राज्यात दुष्काळ आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असताना काँग्रेस सरकारने दूध दरवाढ आणि बस प्रवास भाडेवाढीचा निर्णय घेऊन जनतेच्या अडचणीत आणखी भर घातली आहे, अशी टीका भाजप महिला मोर्चा कर्नाटकच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना दुष्काळाच्या संकटात दूध आणि बस प्रवासाच्या दरात वाढ करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या हिताचे कारण पुढे करून दूध दरवाढ करण्यात आली असली, तरी वाढीव दरातील किती रक्कम प्रत्यक्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे, याचा सरकारने खुलासा करावा. तसेच उर्वरित रकमेचा विनियोग कशासाठी होणार आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शक्ती योजनेवरूनही सरकारवर निशाणा

महिलांसाठी शक्ती योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाची सुविधा देण्याची हमी देणाऱ्या सरकारने आता बस भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. एका बाजूला गॅरंटी योजनांचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे भाडेवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावायची, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेस सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दुष्काळ, महागाई आणि त्यात दूध व बस भाडेवाढीचा अतिरिक्त भार यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून दरवाढीच्या निर्णयांचा फेरविचार करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *