



रेशन दुकानदारांच्या मासिक बैठकीत सुर्यकांत कुलकर्णी यांचे गौरवोद्गार; ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
खानापूर : खानापूर तालुक्यातील रेशन दुकानदारांची मासिक बैठक आज नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वैभव कुलकर्णी होते. गॅरंटी योजना अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी, उपतहसीलदार शरणाप्पा बागेवाडी, आहार विभागाचे महादेव दळवी (माजी अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी बोलताना गॅरंटी योजना अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्था अत्यंत व्यवस्थित सुरू आहे. रेशनधारकांना योग्य पद्धतीने रेशन वितरण करणे तसेच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी चांगले काम केले आहे. याबद्दल त्यांनी सर्व दुकानदारांचे अभिनंदन केले.
ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
खानापूर तालुक्यात अद्याप 17,377 रेशनधारकांची ई-केवायसी बाकी असून, त्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या रेशनधारकांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपल्या संबंधित रेशन दुकानात जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता असल्याने दुकानदारांनीही आपल्या गावातील नागरिकांना याबाबत जागरूक करावे, असे आवाहन करण्यात आले.
लोंढा व मोहिशेत परिसरातील रेशन वितरणाबाबत सूचना
लोंढा गावातील रेशन वितरण या महिन्यात व्यवस्थित झाल्याची माहिती मोहिशेत व लोंढा ग्रामपंचायतीतील नागरिकांनी दिली. यावेळी लोंढा रेशन दुकानदारांना सूचना करताना, रेशन उपलब्ध झाल्यानंतर पहिल्या सहा दिवसांत मोहिशेत ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना रेशन वितरण करावे आणि त्यानंतर लोंढा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना रेशन वाटप करावे, असे सांगण्यात आले.
वयोवृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या लाभार्थ्यांना घरपोच रेशन
अन्न सुविधा योजनेंतर्गत अंथरुणाला खिळलेले रुग्ण व वयोवृद्ध रेशनधारकांना 2 टक्के लाभार्थ्यांसाठी घरपोच रेशन वितरणाची सुविधा उपलब्ध आहे. अशा लाभार्थ्यांची यादी संबंधित रेशन दुकानदारांनी तहसील कार्यालयात सादर करावी आणि त्यांना घरपोच रेशन देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.
निलावडे पंचायत क्षेत्रातील रेशन वितरणाबाबत कडक सूचना
निलावडे पंचायत क्षेत्रात रेशन वितरण करणाऱ्या दुकानदारांनी नियमितपणे किमान चार दिवस रेशन वाटप करणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित रेशन दुकान रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दुकानदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : सुर्यकांत कुलकर्णी
सर्व रेशन दुकानदारांनी आपले काम प्रामाणिकपणे व व्यवस्थित सुरू ठेवावे. दुकानांची स्वच्छता राखावी तसेच दुकानासमोरील फलक व्यवस्थित ठेवावेत. नागरिकांच्या हिताची काळजी घेणाऱ्या दुकानदारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून त्यांना सहकार्य करू. दुकानदारांनी कोणतीही चूक करू नये आणि खानापूर तालुक्याचा रेशन वितरणातील नावलौकिक कायम राखावा, असे आश्वासन सुर्यकांत कुलकर्णी यांनी दिले.
खानापूर तालुक्यातील रेशन वितरण व्यवस्थेची चांगली कामगिरी पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पोहोचत असून, तालुका रेशन वितरणाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या बैठकीला मार्केटिंग सोसायटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर निलजकर, आहार विभागाचे निरीक्षक, खानापूर तालुका रेशन असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta