



जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरील रस्ता रोखून सरकार व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी बेळगावमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन मंगळवारी अधिक तीव्र झाले. जिल्हा प्रशासनाने सर्व शेतकरी प्रतिनिधींना विश्वासात न घेता काही निवडक शेतकरी नेत्यांसोबत अज्ञातस्थळी बैठक घेतल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको आंदोलन छेडले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याने दुपारपासून मोठ्या संख्येने शेतकरी बैठकीची प्रतीक्षा करीत होते. मात्र, बैठक सुरू न झाल्याने आणि प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता अडवून जोरदार निदर्शने केली.
यावेळी चन्नम्मा चौकाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून बसगाड्याही रोखल्या. सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दुसरीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अज्ञातस्थळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली. या बैठकीला शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी, शशिकांत गुरूजी तसेच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे उपस्थित असल्याचे समजते.
एकीकडे निवडक नेत्यांसोबत बैठक आणि दुसरीकडे आंदोलनस्थळी प्रतीक्षेत असलेले शेतकरी, यामुळे ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी आंदोलनातील असंतोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta