Friday , November 6 2026
Breaking News

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील व्यापारी मार्गांवरील वाहतूक बंदी शिथिल करा!

Spread the love

व्यापारी संघटनांची पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्याकडे मागणी; वाहतूक समस्यांबाबत निवेदन सादर

बेळगाव : दिवाळीच्या सणासुदीच्या काळात बेळगाव शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमधील रस्ते बंदी आणि वाहतूक निर्बंध शिथिल करून ग्राहकांना बाजारपेठेत येण्यासाठी सुलभ व्यवस्था करावी, अशी मागणी बेळगावमधील व्यापारी संघटनांनी केली आहे.

पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या सूचनेनुसार बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन आणि ट्रेडर्स कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) जोतिबा आर. निकम यांची भेट घेऊन विविध वाहतूक समस्यांवर चर्चा केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी मांडणारे निवेदनही त्यांना सादर करण्यात आले.

दिवाळी हा व्यापारी वर्गासाठी वर्षातील महत्त्वाचा आर्थिक हंगाम असून, या काळात बेळगावच्या बाजारपेठेत गोवा, कोकण, हुबळी-धारवाड, उत्तर कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येतात. मात्र, प्रमुख व्यापारी मार्गांवरील बॅरिकेडिंग, रस्ते बंदी आणि वाहतूक वळविण्याच्या निर्णयामुळे ग्राहकांना बाजारपेठेत पोहोचताना अडचणी येत आहेत. परिणामी ग्राहकांची संख्या कमी होऊन व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करावी, याला व्यापारी संघटनांचा विरोध नाही. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना करताना व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

प्रमुख व्यापारी रस्ते पूर्णपणे बंद करण्याऐवजी नियंत्रित किंवा एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करावी. वाहतूक निर्बंध ठरावीक वेळेपुरते मर्यादित ठेवावेत, पर्यायी मार्गांवर दिशादर्शक फलक लावावेत तसेच गर्दीच्या काळात ग्राहकांसाठी पार्किंग आणि मालाच्या चढ-उताराची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

याशिवाय रस्ते बंद करण्यापूर्वी पोलीस विभाग, महानगरपालिका आणि व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक घ्यावी. मिरवणुकांचे मार्ग, वेळा आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेची माहिती नागरिक व व्यापाऱ्यांना आगाऊ द्यावी. वाहतुकीच्या समस्यांबाबत तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी स्वतंत्र संपर्क यंत्रणाही निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली.

दिवाळीच्या काळात बाहेरगावाहून येणाऱ्या ग्राहकांना बेळगावच्या बाजारपेठेत सहजपणे पोहोचता आले पाहिजे. व्यापाऱ्यांच्या उपजीविकेवर आणि शहराच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी प्रमुख व्यापारी भागांतील वाहतूक निर्बंधांचा फेरआढावा घेऊन आवश्यक त्या सवलती द्याव्यात, अशी विनंती एसीपी जोतिबा आर. निकम यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, सचिव मुकेश खोडा, उपाध्यक्ष मुकेश संघवी व राजू पालीवाला, खजिनदार नितेश जैन व लालचंद चापरू, सहसचिव कमलेश खोडा, सदस्य प्रशांत कल्लिमनी तसेच बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *