



स्थायी समिती अध्यक्ष रमेश मायलूगोळ यांची अधिकाऱ्यांना सूचना; नागरिकांची कामे विनाविलंब करण्याचे निर्देश
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये एजंट आणि मध्यस्थांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी सूचना कर निर्धारण, वित्त व अपील स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश मायलूगोळ यांनी अधिकाऱ्यांना केली.
मंगळवारी महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. समिती सदस्य, नगरसेवक आणि नागरिकांकडून विभागीय कार्यालयांतील एजंटांच्या वाढत्या वावराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांसह स्वतः कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे एजंट किंवा मध्यस्थांच्या मदतीशिवाय विनाविलंब पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
बैठकीत उपमहापौर हनुमंत कोंगाली यांनी अशोकनगर येथील बॅडमिंटन कोर्ट इमारतीच्या वार्षिक देखभाल कराराची मुदत संपल्याने संबंधित कंत्राटदाराकडून थकीत रक्कम व्याजासह वसूल करणे आणि नवीन करार करण्याबाबत माहिती घेतली.
समिती सदस्य ब्रह्मानंद मिरजकर यांनी बापट गल्ली येथील कार पार्किंग कंत्राटाची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर त्यांनी असमाधान व्यक्त केले. यावेळी सत्ताधारी पक्षाचे गटनेते संतोष पेडणेकर यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि संबंधित कर्मचाऱ्यांसह पुढील बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
ऑनलाइन मालमत्ता कर प्रणालीचे व्यवस्थापन करणाऱ्या सॉफ्टवेअर कंपनीच्या वार्षिक देखभाल कराराची मुदतवाढ, ई-आस्ति फाईल्सच्या मंजुरीतील विलंब तसेच सह्याद्रीनगर येथील सार्वजनिक उद्यानाला ‘वीर सावरकर उद्यान’ असे नाव देण्याच्या प्रस्तावासह विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याची सूचना करण्यात आली.
महापौर प्रीती कामकर यांनी शहरातील विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कर वसुलीला प्राधान्य देऊन थकबाकी वसुलीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला समिती सदस्य शंकर पाटील, रविराज सांब्रेकर, दीपाली टोपगी, मोदिनसाब मतवाले, बसवराज मोदगेकर, नगरसेवक, महसूल विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, प्रशासन विभागाचे उपायुक्त उदयकुमार बी. टी., नगरसचिव रमेश बडिगेर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta