Friday , November 6 2026
Breaking News

ऊसदरावरून कारखानदार आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी तफावत; बुधवारी तोडगा काढण्याचा प्रयत्न : मंत्री सतीश जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील ऊसदर निश्चितीवरून निर्माण झालेला तिढा बुधवारी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृह आणि जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी तसेच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

शेतकरी आणि कारखानदार यांच्या मागण्यांमध्ये मोठी तफावत आहे. दोन्ही बाजूंमध्ये एकमत घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आवश्यक असल्यास बुधवारी पुन्हा साखर कारखानदारांची बैठक घेण्यात येईल. तसेच ऊसदराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साखरेच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असल्याने साखर कारखान्यांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साखरेला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करण्याची मागणी सरकारने केली आहे. एमएसपी निश्चित झाल्यास साखर कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, असेही जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील दरातील तफावत कमी करून दोन्ही बाजूंना मान्य होईल असा ऊसदर निश्चित करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी या प्रश्नावर अंतिम तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *