



पोलीस परवानगी नाकारल्यानंतरही फेरी काढल्याचा ठपका; वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आरोप
बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह एकूण ३० जणांविरुद्ध मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रशासनाने फेरीसाठी परवानगी नाकारली असतानाही फेरी काढल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
एक नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता संभाजी उद्यान येथून काळा दिन सायकल फेरी काढण्यात आली होती. या फेरीसाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. असे असतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत फेरीत सहभागी झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या फेरीदरम्यान सार्वजनिक रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालून नागरिकांना त्रास दिल्याचा ठपकाही पोलिसांनी ठेवला आहे. या प्रकरणी सोमवारी (ता. २) मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्राच्या समर्थनार्थ तसेच बेळगाव आणि कर्नाटकातील अन्य सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याच्या मागणीसाठी फेरी काढण्यात आली होती. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी अनेक दशकांपासून प्रलंबित आहे.
सहा पदाधिकाऱ्यांसह ३० जणांवर गुन्हे
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष मनोहर कल्लाप्पा किणेकर, सरचिटणीस मालोजीराव शांताराम अष्टेकर, रामाकांत जयवंत कोंडुसकर, रणजित राजाराम चव्हाण-पाटील आणि अंकुश अरविंद केसकर यांच्यासह अन्य ३० जणांची नावे गुन्ह्यात नोंदविण्यात आली आहेत. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी यांनी फिर्याद दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta