



निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच वातावरणात बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात सूर्यदर्शन दुर्मिळ झाले असून, कडक उन्हाऐवजी आकाश पूर्णपणे काळ्या ढगांनी व्यापून जात आहे. वातावरणातील या बदलामुळे कुठल्याही क्षणी पाऊस पडेल अशी चिन्हे निर्माण झाले आहेत. तरीही पावसाने मात्र शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे. या लहरी हवामानामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाचे डोळे पुन्हा एकदा आकाशाकडे लागले आहेत.
यंदातालुक्याला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामाची पूर्वतयारी झाली आहे. मात्र पाऊस नसल्याने रब्बी हंगांम लांबला आहे. विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याने तळ गाठल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. याशिवाय नदीतील पाणीही कमी होत आहे. अशा वेळी जर निसर्गाने साथ देऊन एखादा मोठा पाऊस पाडला, तर पिकांना जीवनदान मिळेल आणि पाण्याची पातळी वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र ढग जमा होऊनही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta