



निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील रुतिक लाखे याने ५५ किलो वजनी गटात सलग दोन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
उडुपी येथील श्री महालक्ष्मी मंदिर, उचिला येथे ‘कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स’च्या मान्यतेने आणि उडुपी जिल्हा असोसिएशनतर्फे ‘मिस्टर दसरा २०२६’ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५५ किलो गटात रूतिक लाखे याने उत्कृष्ट शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करत प्रथम स्थान मिळवले.
त्यानंतर रायचूर येथे एन. एस. बोशराजू फाउंडेशन पुरस्कृत ‘मिस्टर कर्नाटक रत्न २०२६’ या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेतही रुतिकने बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. रायचूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि आर. व्ही. फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेतही त्याने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. लाखे याने मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, मार्गदर्शक, शरीरसौष्ठव प्रेमीतून कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta