Sunday , July 26 2026
Breaking News

सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा सुरूच; कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरूच राहणार असून मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने निर्णायक संघर्ष उभारला जाईल, असा ठाम निर्धार समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला.

१ जून १९८६ च्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

प्रकाश मरगाळे यांनी सांगितले की, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक नामफलकांवर ६० टक्के कन्नडबरोबर ४० टक्के इतर भाषांमध्ये मराठीला प्राधान्य देत त्याची अंमलबजावणी २२ जूनपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना सीमाभागात कन्नड सक्ती करू नये, ही समितीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्रातील खासदारांची भेट घेऊन लोकसभेत हा विषय उपस्थित करण्याची मागणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच २२ जूनपर्यंत मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देत सीमाप्रश्नाची सोडवणूक हाच या प्रश्नावरील कायमस्वरूपी उपाय असल्याचे सांगितले. २२ जून रोजी आयोजित विराट मोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, युवा नेते आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, नगरसेवक रवी साळुंके, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीनिशी संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *