Sunday , September 20 2026
Breaking News

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love

 

वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली

बेळगाव : शहरवासीयांची तहान भागविणारा राकसकोप जलाशय आता तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी जलाशयाच्या पाणीपातळीत आणखी एक फुटाची वाढ झाल्याने जुनी २४७० फूट पातळी पूर्ण झाली असून, आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या साडेचार फूट पाण्याचीच आवश्यकता आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

शुक्रवारी जलाशय परिसरात २७.९ मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १,२४१ मिमी पावसाची नोंद झाली असून, वाढत्या पाण्याच्या आवकेमुळे वेस्ट वेअरच्या दरवाजांवरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे जलाशयाने जुनी पाणीपातळी गाठत आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

बेळगाव शहर व उपनगरांची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन १९८५ मध्ये शहर पाणीपुरवठा मंडळाने मार्कंडेय नदीवर सहा वेस्ट वेअर दरवाजे उभारून जलाशयाची साठवण क्षमता वाढविली होती. त्यामुळे पाणीपातळी २४७५ फूटांपर्यंत वाढविण्यात आली होती. आता या वाढीव क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ साडेचार फुटांचा टप्पा बाकी राहिला आहे.

जलाशयाने जुनी २४७० फूट पातळी गाठल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागातर्फे गंगापूजन करण्यात आले. कार्यकारी अभियंता, जलाशय अधिकारी प्रवीण सायनेकर तसेच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून जलाशय लवकरच तुडुंब भरावा, अशी प्रार्थना करण्यात आली.

——————————————————————–

दोन दिवसांत राकसकोप ‘फुल’ होण्याची चिन्हे

पाणीपातळीत एका दिवसात एक फुटाची वाढ

जुनी २४७० फूट पातळी पूर्ण

पूर्ण क्षमतेसाठी फक्त ४.५ फूट पाणी आवश्यक

वेस्ट वेअरवरून पाणी वाहण्यास सुरुवात

पाऊस कायम राहिल्यास दोन दिवसांत जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता.


About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *