Sunday , September 20 2026
Breaking News

35 वर्षांची अखंड परंपरा; विठूनामाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात

Spread the love

 

टाळ-मृदुंगाचा निनाद, पारंपरिक दिंडी, भजन-कीर्तन आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने परिसर भक्तिमय

बेळगाव : “विठू माऊली तू माऊली, जगाची माऊली…” या अभंगाच्या स्वरांसह “ज्ञानोबा… तुकाराम… माऊली…” च्या अखंड गजराने महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील श्री ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर शनिवारी भक्तिरसाने ओथंबून गेला. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेला धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. गेली 35 वर्षे अखंड सुरू असलेला पारंपरिक दिंडी सोहळा यंदाही बाळचिमुकले, महिला भजनी मंडळ आणि शेकडो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिमाखात संपन्न झाला.

पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणींचा महाभिषेक, महापूजा व महाआरती विधिवत पार पडली. गजानन रतन आर्ट्स यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्ती आणि पालखीची आकर्षक फुलांनी सजावटही त्यांच्या सौजन्याने करण्यात आली.

सकाळी ११ वाजता कपिलेश्वर मंदिरातून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. कपिलेश्वर मंदिर, हेमू कलानी चौक, रामलिंग खिंड गल्ली, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, काकती वेस, सोन्या मारुती मंदिर आणि तेथून पी.बी. रोडमार्गे महाद्वार रोड असा पालखीचा मार्ग होता. संपूर्ण मार्गावर “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” च्या अखंड नामगजरात दिंडी भक्तिभावाने पुढे सरकत होती.

सोनोली महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या अभंग, भजन व कीर्तनाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. पारंपरिक वेशभूषेतील महिला, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे परिसरात जणू पंढरीचा सोहळाच अवतरल्याची अनुभूती भाविकांना मिळाली.

मंदिराचे अध्यक्ष मारुती जोशीलकर, सचिव पांडुरंग जाधव आणि खजिनदार वैशाली हुलजी यांच्या उपस्थितीत पालखीचे प्रस्थान करण्यात आले. दिवसभर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिर परिसर विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

यावेळी महेश खटावकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त रेखाटलेल्या आकर्षक रांगोळीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. धार्मिक विधी, पारंपरिक दिंडी, भजन-कीर्तन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात यंदाचा आषाढी एकादशी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *