


नीट प्रकरणावरून मोदी सरकारवर प्रियांक खर्गे यांची टीका
बंगळूर : अन्नभाग्य योजनेतील तांदळाची काळाबाजारात होणारी विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांच्याकडे नवीन कायदा करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
बंगळुर येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी आरोप केला की, अन्नभाग्य योजनेतील तांदळाच्या काळाबाजारात भाजपचेच अनेक नेते सहभागी आहेत. याबाबत आमच्याकडे ठोस पुरावे असून संबंधित आरोपपत्रही सादर करण्यात आले आहे. पुराव्याशिवाय मी कोणतेही विधान करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्नभाग्य योजनेतील तांदूळ फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती (युएई), कतार यांसारख्या देशांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा करत त्यांनी हा प्रकार भाजप नेत्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप केला. “जे तांदूळ चोरी करतात, त्यांनाच भाजप निवडणुकीचे तिकीट देते,” असा टोला त्यांनी लगावला.
या गैरव्यवहाराविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगताना खर्गे म्हणाले, “गृहमंत्री म्हणून मला अवघे चार आठवडे झाले आहेत. आणखी महिनाभराची वाट पाहावी लागणार नाही. लवकरच या प्रकरणात मोठी ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळेल.”
नीट प्रश्नपत्रिका गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत; मात्र विद्यार्थ्यांची मुख्य मागणी असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत ते मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास पंतप्रधान मोदी का घाबरत होते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांना संरक्षण देण्याचे निर्देश आले आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विकसित भारत घडवायचा असेल तर तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पंतप्रधानांनी संसदेत येऊन उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी ‘रील्स’ तयार कराव्यात, अशा पंतप्रधानांच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना खर्गे म्हणाले, “भाजप-धजद कार्यकर्त्यांसाठी रील्स बनवा. गेल्या १२ वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांच्या ५२ प्रश्नपत्रिका फुटल्या. त्यावर रील्स तयार करा.” ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्मार्ट सिटी’ यांसारख्या योजनाही अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना, “काँग्रेस हायकमांडने निर्णय घेतला की विस्तार कोणत्याही क्षणी होऊ शकतो. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा झाली आहे. तीन उपमुख्यमंत्री करण्याबाबत मला माहिती नाही. अंतिम निर्णय हायकमांडच घेईल,” असे त्यांनी सांगितले.
फ्रीडम पार्क येथे सुरू असलेल्या नीट आंदोलनाबाबत बोलताना खर्गे म्हणाले, “आंदोलनकर्त्यांवर कोणतीही दडपशाही करण्यात आलेली नाही. त्यांना पूर्ण सहकार्य दिले आहे. गृह विभाग कसा चालवावा, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटककडून शिकावे.”

Belgaum Varta Belgaum Varta