Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर पीएलडी बँकेच्या कारभारात अनियमितता नाही

Spread the love

 

वार्षिक अहवालाबाबत नियमांचे पालन; आरोप बिनबुडाचे असल्याचा चेअरमन मुरलीधर पाटील यांचा दावा

खानापूर, प्रतिनिधी : खानापूर पीएलडी बँकेचा कारभार सरकारी नियम व कायद्यानुसार पारदर्शकपणे सुरू असून बँकेच्या कामकाजात कोणतीही अनियमितता झालेली नाही, असा दावा बँकेचे चेअरमन मुरलीधर पाटील यांनी केला. माजी संचालक के. एम. घाडी यांनी बँकेने वार्षिक अहवाल छापला नसल्याचा तसेच कारभारात अनियमितता असल्याचा केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा असून बँकेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

खानापूर येथील पीएलडी बँकेच्या कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

वार्षिक अहवालाबाबत नियमांचे पालन

पीएलडी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, २१ सप्टेंबर रोजी होणार आहे. सभेबाबत सर्व सभासदांना नियमानुसार नोटिसा पाठविण्यात आल्या असून, वार्षिक अहवालाची प्रत आवश्यक असलेल्या सभासदांनी बँकेतून ती घेऊन जावी, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सभासदांना अहवालाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सभेच्या दिवशी उपस्थित सभासदांची सही घेतल्यानंतर त्यांना अहवाल देऊन सभागृहात प्रवेश दिला जातो. ही पद्धत खानापूरपुरती मर्यादित नसून बेळगाव जिल्ह्यातील पीएलडी बँकांमध्येही पाळली जाते, असा दावा पाटील यांनी केला.

घाडी यांना नियमांची माहिती असूनही आरोप

के. एम. घाडी यांनी यापूर्वी बँकेचे संचालक म्हणून काम केले असल्याने त्यांना बँकेचे नियम, कायदे व कामकाजाची पद्धत माहिती आहे. असे असतानाही बँकेने वार्षिक अहवाल छापला नसल्याचा आरोप करणे योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले. घाडी यांनी यापूर्वी विरोधी पॅनलमधून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना अपयश आल्याने राजकीय हेतूने प्रेरित होऊन बँकेवर आरोप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

सर्वपक्षीय संचालक मंडळ

बँकेच्या सत्ताधारी पॅनलमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती, काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांशी संबंधित संचालक आहेत. पक्षीय राजकारणापेक्षा सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन बँकेचा कारभार पारदर्शकपणे सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बँकेचे नियमानुसार ऑडिट झाले असून आर्थिक व्यवहारही सरकारी नियमांनुसारच केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेत प्रश्न विचारण्याचे आवाहन

बँकेच्या कारभाराबाबत सभासदांच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास त्यांनी २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते थेट विचारावेत. त्यांना योग्य उत्तर देण्यास संचालक मंडळ तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘गॅप मनी’अभावी पीएलडी बँकांवर आर्थिक परिणाम

राज्यातील अनेक पीएलडी बँका सध्या आर्थिक अडचणीत असल्याचा मुद्दाही पाटील यांनी मांडला. सरकारकडून बँकांना मिळणारी ‘गॅप मनी’ची रक्कम उपलब्ध न झाल्याने पीएलडी बँकांवर आर्थिक परिणाम झाला आहे. त्यामुळे केवळ खानापूर पीएलडी बँकेच्या आर्थिक स्थितीवरून कारभाराबाबत आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

सहा कर्मचाऱ्यांवर कारभार

खानापूर पीएलडी बँकेत सध्या सहा कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी पाच कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात आहेत. कायमस्वरूपी नोकरभरतीस परवानगी नसल्याने तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच कामकाज चालवावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बँकेला उपलब्ध होणारा निधी नाबार्डच्या माध्यमातून येतो आणि त्याचा वापर सरकारी नियमांनुसार केला जातो. बँकेचे ऑडिटही नियमानुसार होत असल्याने आर्थिक व्यवहारात अनियमितता होण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘एक रुपया मागितल्याचे सिद्ध करा’

आपण गेल्या १७ वर्षांपासून बँकेचे संचालक असून तीन वेळा चेअरमनपद भूषविले आहे, असे पाटील यांनी सांगितले. “माझ्या कारकिर्दीत मी कोणाकडूनही एक रुपया मागितलेला नाही. मी कोणाकडे पैसे मागितल्याचे सिद्ध झाल्यास बँकेच्या संचालक व चेअरमनपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे,” असे आव्हान त्यांनी दिले.

पत्रकार परिषदेला चेअरमन मुरलीधर पाटील यांच्यासह विरुपाक्ष मा. पाटील, नारायण ना. पाटील, सुभाष निं. गुरव, निलकंठ कै. गुंजीकर, कुतुबुद्दीन ऊ. बिच्चन्नावर, सुनील वि. चोपडे, यमनाप्पा च. राठोड, श्रीकांत स. करजगी, लक्ष्मी शि. पाटील आणि शंकर बि. सडेकर (जांबोटकर) हे ११ संचालक उपस्थित होते. चार संचालक अपरिहार्य कारणास्तव पूर्वपरवानगी घेऊन अनुपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरच्या भातशेतीत हत्तींचा धुमाकूळ; ग्रामस्थांनी हत्तींपासून दूर राहण्याचे वन विभागाचे आवाहन

Spread the love खानापूर : खानापूर वन उपविभागातील विविध भागांत गेल्या आठवड्यापासून हत्तींच्या कळपाचा वावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *