Sunday , September 20 2026
Breaking News

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love

 

 

चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले

निलजी : दुसऱ्या बाळंतपणानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने निलजी (ता. बेळगाव) येथील ब्रह्मलिंग गल्लीतील सौ. ज्योती निवृत्ती पाटील (वय २६) यांचा हुबळी येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १७) पहाटे मृत्यू झाला. अवघ्या २६व्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनाने निलजीसह कमलापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्योती यांना सोमवारी (दि. १४) प्रसूतीकळा सुरू झाल्याने धारवाड येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि. १५) त्यांनी एका कन्येला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली.

प्रकृती अधिक खालावल्याने मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता त्यांना रुग्णवाहिकेतून हुबळी येथील किम्स रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. डॉक्टरांनी तसेच कुटुंबीयांनी त्यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्योती यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा चार वर्षांचा मुलगा आणि नुकतीच जन्मलेली कन्या या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले आहे. विशेषतः नवजात कन्येला जन्मत:च मातृप्रेमापासून वंचित व्हावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्योती यांच्या पश्चात पती, चार वर्षांचा मुलगा, नवजात कन्या, दीर, जाऊ आणि सासू असा परिवार आहे. हसतमुख व मनमिळावू स्वभावाच्या ज्योती यांच्या अकाली निधनाने निलजी तसेच कमलापूर परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *