







बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही या उत्सवाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. याच भावनेतून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग येथील ‘बेळगांवचा कैवारी’ मंडळातर्फे यंदा ‘ज्ञान दान’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
गणपती बाप्पाला विद्या, ज्ञान आणि कलेचे दैवत मानले जाते. त्यामुळे पूजेच्या साहित्याऐवजी पुस्तके, वह्या, पेन, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचे दान करण्याचे आवाहन मंडळाने नागरिकांना केले आहे.
या उपक्रमातून संकलित होणारे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला छोट्याशा योगदानातून हातभार लागावा, त्याच्या ज्ञानाची वाट अधिक सुकर व्हावी आणि भविष्यास नवी दिशा मिळावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘पूजेच्या साहित्याऐवजी ज्ञानाचे साहित्य बाप्पाच्या चरणी अर्पण करूया आणि शिक्षणाची ज्योत अधिक तेजस्वी करूया,’ असा संदेश देत मंडळाने नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम आजपासून २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
आयोजक : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, केळकर बाग, बेळगाव.

Belgaum Varta Belgaum Varta