Sunday , September 20 2026
Breaking News

फॅब इंडियाचे माजी संचालक, समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथे वास्तव्यास असलेले समाजसेवक जी. एन. गोपीकृष्ण (75) यांचे रविवारी गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर येथे निधन झाले.
मूळचे बळारी येथील असलेले गोपीकृष्ण यांनी बेळगावसह विविध शहरांमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथून ग्रामीण विकास आणि समाजसेवा विषयात पदव्युत्तर शिक्षण विशेष गुणवत्तेसह पूर्ण केले होते.
त्यांनी ऑक्सफॅम या सेवाभावी संस्थेच्या भारतीय विभागाचे प्रमुख म्हणून काम केले होते. देशभरातील असंख्य हस्तकलाकार, स्वयंसेवी संस्था आणि महिला संघटनांना नियमित आर्थिक मदत तसेच प्रशिक्षणासाठी सहाय्य केले.
यानंतर ते फॅब इंडिया खादी संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य होते. विविध राज्यांतील खादी, हातमाग आणि हस्तकलाकारांच्या उत्पादनांना ब्रँडिंग व आधुनिक डिझाइन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केले. तसेच उत्पादकांना भारतासह परदेशातील बाजारपेठ विस्तारण्यासाठी मदत केली.
गेल्या वर्षी त्यांनी बंगळुरू विद्यापीठाच्या परिसरात कर्नाटकातील मेंढपाळ तसेच लोकरीची वस्त्रे तयार करणाऱ्या समुदायांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करता यावे, यासाठी महिनाभराचे ‘लिव्हिंग लाइटली’ प्रदर्शन आयोजित केले होते.
देश-विदेशात समाजसेवा आणि हस्तकलाकारांचे संपर्कजाळे त्यांनी निर्माण केले होते. त्यांच्या परिचयातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत आमंत्रित करून स्थानिक विद्यार्थी आणि हस्तकलाकारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ते करत असत. नुकतेच त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डिझायनर लॉयड रिचर्ड यांना आमंत्रित करून महिलांसाठी तीन महिन्यांच्या भरतकाम प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन केले होते.
बेळगावच्या यरगट्टीजवळील मेकलमर्डी गावात त्यांनी मितान संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून आसपासच्या गावांतील महिलांना विविध प्रकारच्या गृहसजावटीच्या वस्तू, बॅग, पाकिटे आणि इतर वस्तू तयार करून त्यांची निर्यात करण्याचे प्रशिक्षण दिले. या संस्थेचे सदस्य गेल्या २० वर्षांपासून आपली उत्पादने अमेरिका, युरोप आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्यात करत आहेत.

बेळगावच्या कडोली गावातील बीरेश्वर मंदिराजवळ ग्रामीण कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून महिलांना मेंढीच्या लोकरीपासून तसेच चामड्यापासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले.
टुमकूर जिल्ह्यातील देवरायनदुर्गजवळ हस्तकलाकारांसाठी उत्पादन व विपणन केंद्रही त्यांनी स्थापन केले होते.
विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी त्यांनी तेथे उत्पादित होणाऱ्या खपली गव्हाच्या रव्याची महानगरांतील ग्राहकांना थेट विक्री करता यावी, यासाठी एका संस्थेची स्थापना केली होती.
बेळगावच्या अथणी येथे तयार होणाऱ्या कोल्हापुरी चप्पलांच्या डिझाइनचा युरोपियन फॅशन कंपनी प्राडाने उत्पादकांची पूर्वपरवानगी न घेता वापर करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी गोपीकृष्ण यांनी आपल्या संपर्काचा वापर करून राज्य सरकार, कंपनी आणि कारागिरांची बैठक आयोजित केली. त्यानंतर प्राडाचे अभियंते अथणी येथे येऊन स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देऊ लागले.
त्यांच्या निधनाबद्दल कोल्हापुरी चप्पल कामगार संघ, कडोली प्रशिक्षण केंद्र तसेच इतरांनी शोक व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणपती भाड्याने! बेंगळूरमध्ये उत्सवाची नवी संकल्पना

Spread the love  भव्य मूर्तीची हौसही भागणार; पर्यावरणपूरक विसर्जनाचाही मार्ग मोकळा बेंगळूर : ‘गणपती बाप्पा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *