Sunday , September 20 2026
Breaking News

भारतीय संगीतातील सुश्राव्य अध्यायाचा अंत; ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन

Spread the love

 

मुंबई : भारतीय संगीत विश्वातील सुवर्णकाळाच्या साक्षीदार आणि आपल्या अवीट गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांनी वयाच्या 89 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक दैदिप्यमान तारा निखळल्याची भावना व्यक्त होत असून, संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

1954 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले. त्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात त्यांनी मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांसारख्या दिग्गज गायकांसोबत अनेक अजरामर ड्युएट्स गायली. विशेषतः मोहम्मद रफी यांच्यासोबतची त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘ना तुम हमें जानो’ ही त्यांची हिंदी गाणी आजही तितकीच आवडीने ऐकली जातात.

हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत असतानाच सुमन कल्याणपूर यांनी मराठी सुगम संगीतातही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. ‘शब्द शब्द जपुन ठेव’, ‘केतकीच्या वनी येथे’, ‘पाखरा जा रे दूर देशी’ आणि ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारखी त्यांची भावगीते मराठी माणसाच्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांचा आवाज गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य दर्शवणारा होता, तरीही त्यांनी आपल्या गायकीची एक वेगळी आणि अवीट ओळख जपली. मराठी, हिंदी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओडिसी अशा अनेक भाषांमध्ये 800 हून अधिक गाणी गायली. त्यामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल केंद्र सरकारने 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. याशिवाय त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘गदिमा पुरस्कार’ देखील मिळाला. त्यामुळे सुमन कल्याणपूर यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील एका सुश्राव्य अध्यायाचा अंत झाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *