Sunday , September 20 2026
Breaking News

राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा

Spread the love

 

 

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पहाटे भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतकरी सुखी-समृद्ध व्हावेत आणि महाराष्ट्रावर कृपादृष्टी राहावी, अशी प्रार्थना केली.

यंदाच्या शासकीय महापूजेत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती माने यांना ‘मानाचे वारकरी’ म्हणून महापूजेत सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. गेली २० वर्षे आळंदी-पंढरपूर पायी वारी करणारे माने दाम्पत्य यंदा दर्शनरांगेत प्रथम असल्याने निवड समितीने त्यांची निवड केली.

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी पंढरपुरात दाखल झाले होते. पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर रुक्मिणी मातेचीही महापूजा पार पडली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहाव्यांदा विठ्ठल-रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळवला.

दरम्यान, यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषात संपूर्ण पंढरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाली आहे. दर्शनासाठी सुमारे ८० हजारांहून अधिक भाविक रांगेत असून, पदस्पर्श दर्शनाची रांग तब्बल २० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. संत नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार तसेच प्रदक्षिणा मार्गावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *