
अंतरवली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. अंतरवली सराटी येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या बेमुदत उपोषणावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने १२ सप्टेंबर रोजी झालेल्या समर्थकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.
“नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,” असा इशारा देत जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तसेच मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
असा असेल मुंबई मोर्चाचा मार्ग
१५ सप्टेंबर : अंतरवली सराटी येथून मोर्चाला सुरुवात; पाटोदा (जि. बीड) येथे मुक्काम.
१६ सप्टेंबर : श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथे मुक्काम.
१७ सप्टेंबर : हडपसर (पुणे) येथे मुक्काम.
१८ सप्टेंबर : खोपोली (जि. रायगड) येथे मुक्काम.
१९ सप्टेंबर : सकाळी १० वाजता मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात दाखल होणार.
मुंबईत पोहोचल्यानंतर आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. मोर्चा शांततापूर्ण मार्गाने काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta