
मुंबईतील आरोपींच्या चौकशीतून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; बेळगाव, तुडये, हाजगोळी-सरोळीतील नऊ संशयित ताब्यात
हाजगोळी : चंदगड तालुक्यात अमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्याविरोधात पुणे येथील अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने शनिवारी सायंकाळी जोरदार कारवाई करत हाजगोळी-सरोळी परिसरातील एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. या छाप्यात एमडीएमए ड्रग्जचा मोठा साठा तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सरोळी-हाजगोळी रस्त्यालगत पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्री फार्मवर ही कारवाई करण्यात आली. पोल्ट्री फार्मसारख्या ठिकाणी ड्रग्ज निर्मितीचे साहित्य आढळून आल्याने या ठिकाणी नेमका कोणता उद्योग सुरू होता, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे.
मुंबईतून निघाले ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे!
कुर्ला, मुंबई येथून तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे हाजगोळीतील या कारवाईचा धागा उलगडल्याची माहिती आहे. तपासाची व्याप्ती वाढवत पोलिसांनी बेळगाव येथील दोन, तुडये येथील दोन, हाजगोळी आणि सरोळी येथील प्रत्येकी एक, अशा एकूण नऊ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये पप्पू विठ्ठल मलतवाडकर (सरोळी), संतोष सदानंद बसरी कट्टी, किरण शिंदे (तुडये) आणि रोहित शिंदे (हाजगोळी) यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रग्जची किंमत किती? फॉरेन्सिक तपासणीनंतर होणार उलगडा
पोलिसांनी जप्त केलेल्या एमडीएमएचा नेमका साठा किती आहे आणि त्याची बाजारातील किंमत किती आहे, याचा अधिकृत खुलासा फॉरेन्सिक तपासणीनंतर होणार आहे. कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी येऊन जप्त केलेल्या पदार्थांची व साहित्याची तपासणी करणार आहे.
या कारवाईत अमली पदार्थविरोधी पथक गडहिंग्लजचे अधिकारी, चंदगड पोलिसांसह संबंधित पथक सहभागी झाले होते. पोलिसांकडून जप्त साहित्याची तपासणी सुरू असून, ड्रग्ज निर्मितीमागे नेमके कोण आहे, या रॅकेटला आर्थिक पाठबळ कोणाचे आहे आणि मुंबईपासून चंदगडपर्यंत हे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा तपास सुरू आहे.
चार वर्षांनंतर पुन्हा ड्रग्जचा स्फोट
चार वर्षांपूर्वी ढोलगरवाडी आणि माळेवाडी परिसरातील फार्मासिस्टशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाने चंदगड तालुका हादरला होता. त्यानंतर आता हाजगोळी परिसरात एमडीएमएचा साठा आणि निर्मितीचे साहित्य सापडल्याने चंदगड तालुक्यात अमली पदार्थांचे जाळे पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचल्याने स्थानिक पातळीवर अमली पदार्थांची विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. या कारवाईनंतर ड्रग्ज रॅकेटमधील आणखी कोणकोणते चेहरे समोर येणार? याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta