Sunday , August 23 2026
Breaking News

रहदारी नियमांची ऐसीतैसी! बेळगाव जिल्ह्यात २.३३ लाख वाहनधारकांवर कारवाई

Spread the love

 

हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक; ८,३०० अल्पवयीन वाहनचालक पोलिसांच्या रडारवर

बेळगाव : रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांना आळा बसावा आणि वाहनधारकांमध्ये शिस्त निर्माण व्हावी, यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही वाहनधारकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या दीड महिन्यात बेळगाव जिल्ह्यात तब्बल २ लाख ३३ हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये सर्वाधिक १ लाख ७५ हजार वाहनधारक हेल्मेटविना वाहन चालविताना आढळले. तर ८,३०० अल्पवयीन वाहनचालक आणि ३,३०० ट्रिपल सीट प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नलचे उल्लंघन यांसह विविध वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

सीसीटीव्हीची करडी नजर; नियमभंग करणाऱ्यांची खैर नाही

बेळगाव शहरातील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. कॅमेऱ्यात नियमभंग कैद होताच संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

शहरापुरती मर्यादित असलेली ही यंत्रणा आता जिल्ह्याच्या विविध तालुक्यांपर्यंत पोहोचली आहे. राज्य पोलीस खात्याच्या मंजुरीनंतर तालुका पातळीवरील शहरांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

जनजागृतीचा परिणाम किती?

वाहतूक नियम पाळण्याबाबत पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जाते. हेल्मेट वापरा, मोबाईलवर बोलत वाहन चालवू नका, अल्पवयीनांच्या हातात वाहन देऊ नका, सिग्नलचे पालन करा, अशा सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र, जनजागृती करूनही नियमभंगाची संख्या कमी होत नसल्याने वाहनधारकांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेषतः अल्पवयीनांकडून वाहन चालविण्याची ८,३०० प्रकरणे समोर येणे ही गंभीर बाब आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हाती वाहन देताना त्यांच्या सुरक्षिततेचा तसेच इतरांच्या जीविताचा विचार करण्याची गरज आहे.

दंडाची नोटीस हातात; तरीही भरण्याकडे पाठ

पोलिसांच्या कारवाईनंतर वाहनधारकांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. मात्र, दंडाची नोटीस मिळूनही मोठ्या प्रमाणावर वाहनधारक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नियमभंगासोबतच दंड वसुलीचेही आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

नियम पाळणे हीच खरी सुरक्षितता!

वाहतूक पोलिसांची कारवाई ही केवळ महसूल वसुलीसाठी नसून, रस्त्यांवरील जीवितहानी रोखण्यासाठी आहे. हेल्मेटचा वापर, सीटबेल्ट, सिग्नलचे पालन, मोबाईलचा वापर टाळणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे या साध्या नियमांचे पालन केल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात.

सीसीटीव्हीची नजर चुकवता येईल; मात्र वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्याने निर्माण होणारा धोका चुकवता येणार नाही. त्यामुळे दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वाहनधारकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत साजरा करा; डीजेला पूर्णपणे बंदी

Spread the love  बेळगाव : ईद-ए-मिलादचा उत्सव शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *