
बेळगाव : कर्जबाजारीपणाच्या आर्थिक विवंचनेतून मंगाईनगर, वडगाव येथील एका विणकर कामगाराने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विठ्ठल निंगाप्पा लोकरे (४२) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
१५ ऑगस्टच्या रात्री ११ वाजल्यापासून रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक अडचणींमुळे लोकरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते, केपीसीसी सरचिटणीस तथा डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी लोकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून त्यांना धीर दिला. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
कर्जबाजारीपणामुळे कष्टकरी कुटुंबावर संकट
विठ्ठल लोकरे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. कष्टकरी विणकर कामगाराच्या मृत्यूने आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबांसमोरील प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत शासनाने कर्जबाजारी व आर्थिक संकटात सापडलेल्या कष्टकरी कुटुंबांना तातडीने मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta