Friday , October 23 2026
Breaking News

मोटार पंप चोरणाऱ्या दोघांना अटक; ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

 

 

मारिहाळ पोलिसांची कारवाई; मोटार पंपांसह ३०० मीटर केबल हस्तगत
बेळगाव : शेतातील पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेले मोटार पंप आणि केबल वायर चोरणाऱ्या दोघांना मारिहाळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे १२ मोटार पंप, ३०० मीटर केबल वायर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबर २०२६ रोजी मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुदली गावातील सर्व्हे क्रमांक ७०/५ मधील शेतातून टेक्समो कंपनीचा ५ एचपी क्षमतेचा, २० हजार रुपये किमतीचा मोटार पंप चोरीला गेला होता. तसेच हुदली परिसरातील इतर गावांमधील शेतकऱ्यांचेही मोटार पंप चोरीला गेल्याच्या तक्रारीवरून मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
मोटार पंप आणि केबल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी बेळगाव ग्रामीण उपविभागाच्या एसीपींच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने २२ ऑक्टोबर रोजी मारिहाळ-तुम्मरगुद्दी रस्त्यावर एका मोटारसायकलवरून पोत्यात मोटार पंप घेऊन जाणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हुदली, तुम्मरगुद्दी मारिहाळ, खनगाव, रंगदोळी आदी गावांमध्ये मोटार पंप आणि केबल वायर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुडदप्पा निंगाप्पा तळवार (वय ३६, रा. तुम्मरगुद्दी, बेळगाव) आणि कल्लाप्पा लक्काप्पा नायक (वय ४२, रा. करिकट्टी, बेळगाव) अशी आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून १२ मोटार पंप, ३०० मीटर केबल वायर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा छडा लावून चोरीला गेलेले पंप हस्तगत करण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री. आय. आर. पट्टणशेट्टी, पीआय श्री. चंद्रशेखर, सी., पीएसआय तसेच पोलीस कर्मचारी बी. बी. कड्डी, आर. एस. बळुंडगी, आर. एच. तळवार, टी. जी. सुळकोड, आर. बी. कुरुबर, आर. एस. तळेवाड आणि आर. एस. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वीस दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या!

Spread the love  विद्यार्थ्यांची शाळेकडे धाव; दुसऱ्या सत्राला प्रारंभ, सहामाही निकालाची प्रतीक्षा बेळगाव : दसऱ्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *