Friday , October 23 2026
Breaking News

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक

Spread the love

 

ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ; शिक्षण, सामाजिक उपक्रमांतून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प

खानापूर : बेळगाव येथील वेदांत फाउंडेशनने खानापूर तालुक्यातील मोरब येथील गवळीवाडा गाव दत्तक घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारली आहे. या ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ बुधवारी (ता. २१) उत्साहात झाला. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विविध विधायक उपक्रमांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला चालना देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक ‘सकाळ’च्या बेळगाव आवृत्तीचे विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन मुगळी आणि ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य प्रतिनिधी सुनील पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. गावातील ज्येष्ठ नागरिक काळू थोरवत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बेळगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर करंबळकर, ॲड. सुधीर चव्हाण, वेदांत फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, अरुण मु. चंडीकर, नारायण नलवडे आणि शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे गावांमधील शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वेदांत फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणारे सतीश पाटील यांच्या कार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले. फाउंडेशनच्या प्रयत्नांतून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांनीही भविष्यात समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

देणगीतून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

ग्रामविकास प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींनी साहित्य व आर्थिक स्वरूपात योगदान दिले. प्रेमराज चिंडक फाउंडेशनतर्फे २७५ ताटे, हजारे किचनतर्फे २७५ वाट्या देण्यात आल्या. वेदांत फाउंडेशनतर्फे ३५ हजार रुपयांचा रंग देण्यात आला. श्रीकांत नगारे यांनी सात हजार रुपये खर्चून नामफलक तयार करून दिला, तर कल्पना गाडगीळ यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. या योगदानातून ग्रामविकासाच्या उपक्रमाला सामाजिक सहकार्याची जोड मिळाली.

भजन आणि गज्जो नृत्याने कार्यक्रमात रंगत

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनाने उपस्थितांची मने जिंकली. धनगर बांधवांचे पारंपरिक गज्जो नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. मुंबई येथील सुदाम प्रभू यांचे प्रवचन, हरिभजन आणि संत मंडळींच्या नगरसंकीर्तनामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरणाची जोड मिळाली. मोहन पाटील, रविंद्र हरगुडे, अनुतारीहाळकर आणि वैजू गुरव यांनी समयोचित भाषणांतून ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

ग्रामस्थांच्या सहभागातून विकासाला दिशा

गवळीवाडा गावाच्या गरजा लक्षात घेऊन आगामी काळात विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन वेदांत फाउंडेशनने केले आहे. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देत गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. प्रकल्पाच्या शुभारंभामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्यक्ष विकासकामांतून गावाचा कायापालट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या बदलीची शक्यता?; भावनिक भाषणामुळे तर्कवितर्कांना उधाण

Spread the love  बेळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आयएएस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *