Friday , October 23 2026
Breaking News

वीस दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या!

Spread the love

 

विद्यार्थ्यांची शाळेकडे धाव; दुसऱ्या सत्राला प्रारंभ, सहामाही निकालाची प्रतीक्षा

बेळगाव : दसऱ्याच्या वीस दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारपासून शहरासह परिसरातील शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्याने शाळांमध्ये पुन्हा एकदा शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. सुट्टीतील निवांतपणानंतर विद्यार्थ्यांची शाळेकडे धाव, रिक्षांची वर्दळ आणि शाळेच्या घंटानादाने परिसर पुन्हा गजबजून गेला.

प्रथम सत्राची परीक्षा संपल्यानंतर २ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांना दसरा सुट्टी देण्यात आली होती. साधारण वीस दिवसांच्या या सुट्टीनंतर गुरुवारपासून शाळांचे नियमित कामकाज सुरू झाले. सुट्टीच्या काळात अभ्यासापासून काहीसा विरंगुळा मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची वेळ, गृहपाठ आणि वर्गातील अभ्यास यांची सवय लावावी लागणार आहे.

सहामाही निकालाची उत्सुकता

प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडल्याने आता विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष सहामाही परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे. शाळा स्तरावर शालेय व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार आणि सोयीनुसार निकालाच्या तारखा निश्चित केल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शाळांमध्ये निकालाची लगबग पाहायला मिळणार आहे. परीक्षेत मिळालेले गुण आणि पुढील सत्रातील अभ्यासाचे नियोजन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

शाळांच्या स्वच्छतेला प्राधान्य

गुरुवारपासून शाळा सुरू होणार असल्याने बुधवारीच अनेक शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वर्गखोल्या, परिसर आणि विद्यार्थ्यांच्या वापरातील सुविधांची स्वच्छता करून शाळा पुन्हा सुरू होण्यासाठी तयारी करण्यात आली होती.

सुट्टी संपल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्याचा उत्साह दिसत होता, तर काहींचा कल आणखी काही दिवस सुट्टीचा आनंद घेण्याकडे होता. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये ‘थोडी खुशी, थोडा गम’ असे संमिश्र वातावरण पाहायला मिळाले. मात्र, शाळेतील मित्र-मैत्रिणींच्या भेटीची ओढ आणि वर्गातील गमतीजमती यांमुळे विद्यार्थ्यांचा उत्साहही वाढला.

गेल्या वीस दिवसांपासून मंदावलेली सकाळची लगबग आता पुन्हा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांची शाळेला जाण्याची तयारी, पालकांची धावपळ, रिक्षामामांची वर्दळ आणि शाळेची घंटा अशा परिचित दृश्यांनी गुरुवारपासून शहरातील शैक्षणिक परिसर पुन्हा गजबजून गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंडियन दस्तकार हँडलूम अँड हँडिक्राफ्ट हाट प्रदर्शन दिवाळीपर्यंत खरेदीसाठी खुले

Spread the love  बेळगाव : दक्षिण भारतातील विविध ठिकाणी यशस्वी प्रदर्शने आयोजित केल्यानंतर, आता ‘इंडियन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *