


सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी शिक्षण खात्याचे आदेश; मुख्याध्यापकांना आयोजनाच्या सूचना
बेळगाव : रविवारची सुट्टी असली तरी १ नोव्हेंबरला राज्यातील सर्व शाळांमध्ये कर्नाटक राज्योत्सव साजरा करावाच लागणार आहे. सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शालेय शिक्षण खात्याने हा निर्णय लागू केला आहे. यासंदर्भात शिक्षण खात्याचे आयुक्त विकास सुळकर यांनी परिपत्रक जारी केले आहे.
राज्योत्सवाच्या दिवशी रविवार असल्याने कार्यक्रम टाळता येणार नाही, हे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी राज्योत्सवाचे आयोजन योग्य पद्धतीने आणि सन्मानपूर्वक करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय सण आणि महत्त्वाच्या जयंती ज्या पद्धतीने संबंधित दिवशी साजऱ्या केल्या जातात, त्याच धर्तीवर कर्नाटक राज्योत्सवही साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांना रविवारची सुट्टी असली, तरी राज्योत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्योत्सवाचा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta