


विम्याची १०० टक्के भरपाई आणि सरकारकडून भरीव मदतीची मागणी
बेळगाव : निसर्गाच्या संकटांशी दोन हात करत पोटापुरते तरी पीक पदरात पडावे, या आशेने बेळगाव परिसरातील शेतकरी छातीवर दगड ठेवून भात कापणीच्या कामाला लागले आहेत. एकीकडे दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, दुसरीकडे हवामान खात्याने २० ते ३० तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आकाशात दाट ढग जमले असून, कोणत्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने शेतकरी मिळेल त्या मजुरांच्या मदतीने भात कापणी उरकण्याचा प्रयत्न करत आहेत.
भात कापणीसाठी शेतकरी ज्या अवस्थेची वाट पाहतात, तिला स्थानिक भाषेत ‘सराई’ असे म्हणतात. या अवस्थेत भाताच्या लोंब्या गडद पिवळ्या होतात, तर खालचे नळ काही प्रमाणात हिरवे असतात. या काळात कापणी केल्यानंतर दोन ते चार दिवसांनी भाताची बांधणी केल्यास दाणे सुरक्षित राहतात. मात्र, कापणीला उशीर झाल्यास लोंब्या पूर्णपणे सुकतात आणि नळही पिवळे पडतात. त्यामुळे कापणीस अधिक वेळ लागतो, तसेच दाणे मोठ्या प्रमाणात गळून पडतात. परिणामी, शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरण्याची भीती असते.
यंदा अनेक भागांत दुष्काळाचा मोठा फटका भातपिकाला बसला आहे. काही ठिकाणी भाताचे पीक एक फुटापर्यंत वाढल्यानंतरच वाळून गेले. एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च करूनही हातात एक दाणाही पडला नाही, तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. अशा परिस्थितीत पुढील रब्बी हंगामासाठीही भांडवल उभे करणे कठीण होणार आहे.
शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज
दुष्काळ आणि अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीकविमा यंत्रणेने १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, तसेच सरकारने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर शेती करणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणेही कठीण होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta