


धोकादायक वळणावर कार दोन पलट्या खाऊन उलटली; दोन चिमुकल्या मुलींवरील पितृछत्र हरपले
खानापूर : खानापूर–लोंढा महामार्गावर वाटरे आणि जोमतळे गावांदरम्यान गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री झालेल्या भीषण कार अपघातात गुंजी (ता. खानापूर) येथील विनोद संभाजी गुरव (वय ३९) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धोकादायक वळणावर कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दोन पलट्या खाऊन रस्त्यावर उलटली. या दुर्घटनेत विनोद गुरव यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुंजी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
विनोद गुरव हे मूळचे गुंजी गावचे रहिवासी असून, नोकरीनिमित्त गोवा येथे वास्तव्यास होते. गुंजी येथे गेल्या चार दिवसांपासून श्री माऊलीदेवीचा यात्रोत्सव सुरू असल्याने ते यात्रेसाठी गावी आले होते. मात्र, कामानिमित्त गुरुवारी सकाळी ते गोव्याला गेले होते. दिवसभरातील काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी ते पुन्हा गुंजी येथे परतण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कुटुंबीयांनी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, आपण रामनगर येथे असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे कुटुंबीय त्यांच्या घरी परतण्याची वाट पाहत होते. मात्र, रात्री अकरा वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीने फोन उचलून विनोद गुरव यांचा अपघात झाल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघातानंतर विनोद गुरव यांना खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
विनोद गुरव यांच्या पश्चात पत्नी, चार आणि दोन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली, आई-वडील, मोठा विवाहित भाऊ आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. ऐन यात्रोत्सवाच्या काळात गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने गुंजी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या चार आणि दोन वर्षांच्या मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta