


कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले असताना अपघात
खानापूर : खानापूर तालुक्यातील दोड्डहोसूर गावाच्या वेशीवर गुरुवारी रात्री भरधाव इनोव्हा कारने धडक दिल्याने विजय नागेश अनगोळकर (वय ६४) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्याच्या कडेला फिरत असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला.
विजय अनगोळकर यांचे घर दोड्डहोसूर येथील शाळेजवळ असून ते फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी खानापूरहून पारिश्वाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते.
देवलती येथे कार पकडल्याची माहिती
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी संबंधित कारचा पाठलाग केला. त्यानंतर देवलती येथे इनोव्हा कार पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कारच्या मालकाचे नाव आणि चालकाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
उपचारादरम्यान मृत्यू
अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजय अनगोळकर यांना तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. विजय अनगोळकर यांच्या निधनाने दोड्डहोसूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta