


जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार
१ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन
खानापूर : जिल्हा पंचायत व तालुका पंचायतीच्या सर्व जागा लढवणार असा एकमुखी ठराव आज झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. 19 ऑक्टोबर नंतर निवडणूकीची तारीख निश्चित झाल्यानंतर खानापूर तालुका समितीकडून इच्छुक अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी इच्छुकानी आपापल्या मतदारसंघात जनजागृती करून वातावरण निर्मिती करावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी १ नोव्हेंबर २०२६ रोजी राजा शिवस्मारक भवन माजी आमदार श्री. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत दंडाला काळ्याफिती बांधून केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करून धरणे आंदोलन करून काळा दिन गांभीर्याने पाळावा, असा ठराव करण्यात आला. बेळगाव महानगरपालिकेमध्ये बेळगाव कर्नाटकचेच असल्याचा ठराव मंजूर करणाऱ्या व त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या गद्दार नगरसेवकांचा निषेधाचा ठराव करण्यात आला आणि ज्या स्वाभिमानी म. ए. समितीच्या नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेवक शिवाजीराव मंडोळकर, नगरसेविका सौ.वैशाली भातकांडे यांनी ठरावाला विरोध करून सभात्याग केला व आपला मराठी बाणा दाखवला, त्या नगरसेवकांचा अभिनंदनचा ठराव पास करण्यात आला.
पुणे विभाग समितीच्या गेले सहा महिने सातत्यपूर्ण कार्याची व युवा समिती सीमाभागच्या बिदर, भालकी, औराद, संतपुर मराठी सन्मान यात्रेच्या दौऱ्याची दखल घेऊन कौतुक या बैठकीत करण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी लोकशाही मार्गाने आपला हक्क बजावणाऱ्या मतदारांना एसआयआरचे निमित्त करून मतदानातून 13 कोटीच्या वर मतदानातून नावे काढून टाकून भारतीय नागरिकांचा हक्क हिरावून घेतला, त्यासाठी आयुक्तांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा व त्यांच्या निषेधाचा ठराव संमत करण्यात आला.
त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे विद्यमान आमदार श्री.विठ्ठल हलगेकर यांनी एक नोव्हेंबर राज्योत्सवाच्या तयारी बैठकीत मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारे एक वक्तव्य त्यांच्या समाज माध्यमावरील पेजवर केले आहे. त्यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, राज्योत्सव हा खानापूर तालुक्याची संस्कृती व मानबिंदू वाढवणारा उत्सव आहे. हे वक्तव्य म्हणजे खानापूर तालुक्याची मानबिंदू व संस्कृती जपणाऱ्या मराठी माणसाचा अपमान आहे, त्यामुळे त्यांच्या या लिखाणाचाही निषेध या बैठकीत करण्यात आला.
यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ऊस दराचा प्रतिटन पाच हजारावर रुपये हप्ता जाहीर करावा व शेतयकऱ्यांना न्याय द्यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच तालुक्यातील गावा गावांना जोडणारे अनेक रस्ते खराब झालेले असून, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले आहे. वेळेत रस्त्यांचे पुननिर्माण न झाल्यास येत्या काळात यासाठी रास्ता रोको करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षांनी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बेळगावकर, मध्यवर्तीचे सदस्य राजाराम देसाई, युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, वसंत नावलकर, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी जे समितीतून राष्ट्रीय पक्षात सामील झालेले किंवा तटस्थ राहिलेल्यांनी म. ए. समितीच्या मूळ प्रवाहात विलीन व्हावे व आपली म. ए. समिती संघटना समिती बळकट करावी, व सीमाप्रश्न सुटेपर्यंत एकजूट दाखवून प्रत्येक लढ्यात यश खेचून आणावे असे आवाहन अध्यक्षीय भाषणात समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी आवाहन केले.
त्यावेळी संजीव पाटील, रवींद्र शिंदे, बाबुराव पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, मोहन गुरव, आप्पाराव मुतकेकर, ज्योतिबा खाडे, देवाप्पा भोसले, किरण पाटील, कृष्णा मनोळकर, मरू पाटील, गजानन बेळगावकर, नाना घाडी, विठ्ठल गुरव, शंकर गुरव, आदी समिती कार्यकर्ते नेते बैठलीला हजर होते. शेवटी आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta