


अमान सेठ यांच्यासह महापालिका, एल अँड टी, कंत्राटदार आणि बुडा अधिकाऱ्यांसोबत विकासकामांचा आढावा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्यासह महापालिका अधिकारी, एल अँड टीचे प्रतिनिधी, कंत्राटदार आणि बुडा (बेळगाव नागरी विकास प्राधिकरण) अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
या बैठकीत सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, ती पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली संभाव्य मुदत तसेच विलंब झालेल्या कामांची कारणे याबाबत आमदार सेठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिला.
विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असून, कामांच्या विलंबामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच कामे सुरू असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नागरिकांच्या गरजा आणि सोयी-सुविधांना प्राधान्य देऊन विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी यावेळी केले.

Belgaum Varta Belgaum Varta