


बेळगाव : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणारा काळा दिन तसेच आगामी तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, खानापूर रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिक सीमाभाग तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. या निर्णयाच्या निषेधार्थ सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त मूक सायकल फेरी काढून सीमावासीयांकडून निषेध व्यक्त केला जातो.
यंदाच्या काळ्या दिनाच्या आयोजनाबाबत तसेच कर्नाटक सरकारने जाहीर केलेल्या तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकांच्या संदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नियंत्रण व घटक समित्यांचे सदस्य, युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किनेकर, सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले तसेच उपाध्यक्ष रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होणगेकर, मोनाप्पा पाटील आणि विठ्ठल पाटील यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta