Friday , October 23 2026
Breaking News

बोरगाव नगरपंचायतीत चोरीचा धाडसी प्रयत्न

Spread the love

 

चोरटे सीसीटीव्हीत; शहरात भीतीचे वातावरण

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायत कार्यालयालाच चोरट्यांनी लक्ष्य केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरूवारी (ता.२२) मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
याबाबत घटनास्थळासह पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, नगरपंचायतीचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. अकाउंट विभागातील टेबल आणि तिजोरीच्या परिसरातही शोधाशोध करण्यात आली. मात्र संगणकाच्या वायरी वगळता कोणतीही मौल्यवान वस्तू अथवा महत्वाची कागदपत्रे चोरीस गेली नसल्याची माहिती नगर विकास अधिकारी स्वानंद तोडकर यांनी दिली. चोरीचा हा प्रकार नगरपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला असून, घटनास्थळी सदलगा पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली.
मध्यरात्रीच्या सुमारास अंदाजे ३० वर्षीय दोन युवक नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात आले. यातील एकाने बाहेर थांबून परिसरावर नजर ठेवली तर दुसऱ्याने मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर अकाउंट विभागातील टेबलांची
झाडाझडती घेत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती कोणतीही मौल्यवान वस्तू न लागल्याने चोरट्यांनी तेथून पलायन केले. दोन्ही संशयितांनी चेहऱ्यावर मास्क लावल्यांचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
नगरपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असतानाही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने आश्वर्य व्यक्त होत आहे. कार्यालयातील कॉम्प्युटरच्या वायरी वगळता अन्य कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याचे अथवा महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईली हलविल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचा उद्देश नेमका काय होता, हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय कार्यालयातच चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंचेचे वातावरण पसरले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत नगर विकास अधिकारी स्वानंद तोडकर यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर कायमस्वरूपी पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरपंचायत कार्यालयाच्या सुरक्षेसाठी पहारेकरी तैनात करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासह चोरीचा उद्देश तपासला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बोरगाव स्पोर्ट्स’ युथ स्पोर्ट्स ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *