


हजारो लिटर पाण्याची नासाडी; नागरिकांचा पाण्यासाठी आक्रोश
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनहारातील जलवाहिनींच्या गळतीचे सत्र वारंवार सुरू राहिल्याने पाणी वाया जाण्यासोबतच नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही मुख्यत्वेकरून पायाभूत सुविधांची दुरावस्था, जुन्या झालेल्या वाहिन्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे उद्भवणारी समस्या आहे. बेळगाव नाक्यावरील गळती काढत असतानाच पुन्हा राम मंदिर समोरून मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तर दुसरीकडे शहरवासीयांचा पाण्यासाठी आक्रोश सुरू आहे. त्याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन कायमस्वरूपी ही समस्या निकालात काढण्याची मागणी होत आहे.
शहरांमध्ये दशकांपूर्वी टाकलेल्या लोखंडी किंवा सिमेंटच्या पाईपलाईन अजूनही वापरल्या जात आहेत, ज्या आता जीर्ण झाल्या आहेत.
पाण्याचा दाब अचानक वाढल्याने किंवा कमी-जास्त झाल्याने कमकुवत झालेल्या पाईप्सना तडे जात आहेत.
रुंदीकरण, भुयारी मार्ग, किंवा केबल टाकताना होणाऱ्या खोदकामामुळे अनेकदा मुख्य जलवाहिन्या फुटून पाण्याची नासाडी होत आहे. काही ठिकाणी दुरुस्ती करताना किंवा नवीन लाईन टाकताना निकृष्ट दर्जाचे पाईप्स वापरले गेल्याने त्या लवकर खराब होत आहेत . परिणामी लाखो लिटर शुद्धआणि पिण्याचे पाणी रस्त्यांवर वाहून वाया जात आहे. जलवाहिन्याना वारंवार गळती लागल्याने संबंधित परिसराचा पाणीपुरवठा अनेक दिवस खंडित होत आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गळती झालेल्या भागातून सांडपाणी किंवा माती पाईपलाईनमध्ये शिरल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होऊन आजार वाढू लागले आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यानेरस्ते खचून खड्डे पडत आहेत. शिवाय वाहतूक कोंडी होऊन आणि अपघातांचा धोका वाढत आहे.
——————————————————————–
कायमस्वरूपी उपाय
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलवाहिन्यांमधील पाण्याचा दाब आणि गळतीची जागा त्वरित शोधणारी यंत्रणा कार्यान्वित करावी. काळानुरूप बदलः जुन्या आणि जीर्ण झालेल्या
वाहिन्या बदलून त्या जागी उच्च दर्जाच्या वाहिन्या टाकण्यात याव्यात.

Belgaum Varta Belgaum Varta