
बेळगाव : मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बेळगाव भाजपने शनिवारी सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला. भाजप महानगर व ग्रामीणच्या वतीने रास्ता रोको, जेलभरो आंदोलन तसेच बी. नागेंद्र यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने अहोरात्र साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, एवढे आंदोलन करूनही सरकारकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने भाजपने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे.
“भाजपचे आंदोलन सुरू असतानाही सरकारला जाग आलेली नाही. बी. नागेंद्र यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांना पुन्हा महत्त्वाचे खाते देऊन मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे,” असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल बेनके यांनी केला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर बी. नागेंद्र यांनी तत्कालीन सिद्धरामय्या सरकारच्या काळात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात सुमारे ८२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मान्य केले होते, असा दावा बेनके यांनी केला.
“ज्या व्यक्तीवर एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारने त्यांनाच पुन्हा महत्त्वाचे खाते दिले. काँग्रेस सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्यांनाच संरक्षण आणि मोठी पदे दिली जात आहेत,” अशी टीका बेनके यांनी केली.
बी. नागेंद्र यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “नागेंद्र यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. अन्यथा बेळगावपुरते आंदोलन मर्यादित न ठेवता राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल,” असा इशाराही बेनके यांनी कर्नाटक सरकारला दिला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी टायर जाळून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. रास्ता रोकोमुळे चन्नम्मा चौक परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन करणाऱ्या काही भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले; त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
राजीनामा घेईपर्यंत संघर्ष सुरूच
बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजपने आता सरकारविरोधात आरपारच्या लढाईची भूमिका घेतली आहे. साखळी उपोषणानंतर रास्ता रोको, जेलभरो आणि पुतळा दहन अशा आंदोलनांची मालिका सुरू झाल्याने आगामी काळात हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपने दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta