Saturday , August 22 2026
Breaking News

केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी : किरण जाधव यांची मागणी

Spread the love

 

केसरेकर कुटुंबियांच्या पाठिशी मी ठामपणे उभा

बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात झालेल्या हल्ल्यात खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा मोहन केसरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्या दोन मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले असून, या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हल्ल्यात बळी पडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी भाजप नेते तथा सकल मराठा समाज प्रमुख किरण जाधव यांनी केली आहे.

मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनिषा हे रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात गेले होते. 15 ऑगस्ट रोजी कुपवाड एमआयडीसी परिसरातील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे त्यांच्यावर हातोडी व चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मोहन केसरेकर यांचाही 18 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.

पती-पत्नी दोघांचाही काही दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्यांच्या दोन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कमावते आई-वडील गमावल्यामुळे मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या भविष्यातील पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते व सकल मराठा समाजाचे प्रमुख किरण जाधव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची आणि तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये हल्ल्यातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून, कायद्यानुसार त्यांना तातडीने व जलदगतीने न्याय मिळवून देण्यात यावा तसेच दोष सिद्ध झाल्यास कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच, आई-वडील दोघांनाही गमावलेल्या केसरेकर कुटुंबातील मुलांच्या शिक्षण, पालनपोषण व भविष्यातील उदरनिर्वाहाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वीकारावी आणि त्यांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही किरण जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
या प्रकरणात सरकारने संवेदनशीलतेने पुढाकार घेऊन पीडित कुटुंबातील दोन मुलांच्या भवितव्याला आधार द्यावा, अशी अपेक्षा किरण जाधव यांनी व्यक्त केली आहे.

केसरेकर दाम्पत्याला न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी आज बेळगाव शहरामध्ये मराठा समाजाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा असल्यामुळे मला या मोर्चामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही, याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांना माझा संपूर्ण आणि ठाम पाठिंबा आहे, असे किरण जाधव यांनी म्हटले आहे.
केसरेकर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या प्रत्येक प्रयत्नात मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन. समस्त केसरेकर कुटुंबीयांना माझा पूर्ण पाठिंबा असून, त्यांच्या न्यायासाठीची लढाई आपण सर्वजण मिळून पुढे नेऊ, असेही भाजप नेते तथा सकल मराठा समाज प्रमुख किरण जाधव यांनी म्हटले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावणातील दुसरा शुक्रवार भक्तिभावाने साजरा; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

Spread the love  बेळगाव : व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासातील दुसरा शुक्रवार महिलांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *