
बेळगाव : प्रगतिशील लेखक संघ, बेळगाव आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) बेळगाव शाखेच्या वतीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा १३वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी पाळण्यात आला. यावेळी उपस्थितांनी डॉ. दाभोळकर यांच्या कार्याला अभिवादन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
गिरीश संकुलातील भगतसिंग सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिस बेळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य आनंद मेणसे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्ते यश आंबोळे यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अंनिसचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. शाखेचे कार्याध्यक्ष शंकर चौगुले यांनी उपस्थित पाहुण्यांचा पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
प्रमुख वक्ते यश आंबोळे यांनी ‘बसव तत्त्वज्ञान आणि आजचा समाज’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच बसवण्णांनी प्रतिपादन केलेले समता, बंधुता आणि वैज्ञानिकतेचे विचार आजच्या समाजासाठीही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुभाष ओऊळकर, एस. जी. पाटील, अनिल आजगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हसनेकर यांनी केले, तर अर्जुन चौगुले यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta