Friday , October 23 2026
Breaking News

राज्यातील वर्दळीच्या एक हजार गावांत बसथांबे उभारण्याचे नियोजन; विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

Spread the love

 

बेळगाव : ग्रामीण भागात बसची प्रतीक्षा करताना झाडाच्या सावलीचा आधार घेणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. व्हीबी-जी रामजी योजनेअंतर्गत राज्यातील अधिक वर्दळ असलेल्या एक हजार गावांमध्ये बसथांबे उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांना उन्हापावसापासून संरक्षण देणारा हक्काचा निवारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच अन्य कामांसाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. मात्र, अनेक गावांमध्ये बसथांब्यांवर निवारा शेडची सुविधा नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. उन्हाचा कडाका असो किंवा पावसाचा मारा, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो.

ही समस्या लक्षात घेऊन राज्यातील अधिक वर्दळ असलेल्या एक हजार गावांमध्ये बसथांबे उभारण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या बसथांब्यांची रचना करताना ग्रामीण भागाचे सौंदर्य आणि स्थानिक वातावरणाचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना निवाऱ्याची सुविधा मिळण्याबरोबरच गावांच्या सौंदर्यातही भर पडण्याची अपेक्षा आहे.

जुन्या बसथांब्यांचीही होणार दुरुस्ती

नवीन बसथांबे उभारण्याबरोबरच जुन्या निवारा शेडची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचाही नियोजनात समावेश आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या बसथांब्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासोबतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील मूलभूत सुविधांमध्येही सुधारणा होऊ शकते.

About Belgaum Varta

Check Also

गृहज्योती योजनेतून १.३ लाख ग्राहक बाहेर; वैयक्तिक कागदपत्रे देण्यास नकार

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेला मोठा धक्का बसला असून, सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *