Friday , October 23 2026
Breaking News

गृहज्योती योजनेतून १.३ लाख ग्राहक बाहेर; वैयक्तिक कागदपत्रे देण्यास नकार

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेला मोठा धक्का बसला असून, सुमारे १.३ लाख ग्राहकांनी या योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. वैयक्तिक कागदपत्रे सादर करण्यास अनिच्छा आणि गोपनीयतेबाबतची चिंता यामुळे या ग्राहकांनी योजनेपासून दूर राहणे पसंत केल्याचे समजते.

गृहज्योती योजनेंतर्गत पात्र घरगुती वीज ग्राहकांना दरमहा २०० युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. गेल्या तीन वर्षांपासून या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची अलीकडे ऊर्जा विभागाकडून घराघरांत जाऊन पडताळणी करण्यात आली. यावेळी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे मागण्यात आली. मात्र, वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त करत अनेक ग्राहकांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला.

बेळगावसह राज्यातील ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती

या योजनेतून बाहेर पडलेल्या ग्राहकांपैकी सर्वाधिक सुमारे १.२ लाख ग्राहक हे बेंगळुरू वीजपुरवठा कंपनीच्या (बेस्कॉम) कार्यक्षेत्रातील असल्याचे वृत्त आहे. मोठ्या निवासी संकुलांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेषतः गोपनीयतेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

राज्यात सुमारे २.१ कोटी घरगुती वीज ग्राहक असून, त्यापैकी १.८ कोटी ग्राहकांनी गृहज्योती योजनेसाठी नोंदणी केली होती. मात्र, घरगुती पडताळणीदरम्यान सुमारे २५.७ लाख पात्र ग्राहक तपासणीसाठी उपलब्ध झाले नाहीत किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.

३१ ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्याची संधी

पडताळणी पूर्ण न झालेल्या ग्राहकांना संबंधित वीजपुरवठा कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विशेषतः बेस्कॉम क्षेत्रातील सुमारे १६ लाख ग्राहकांची कागदपत्रे अद्याप उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.

दिलेल्या मुदतीत पडताळणी पूर्ण न केल्यास संबंधित ग्राहकांना गृहज्योती योजनेच्या लाभापासून कायमचे वंचित राहावे लागू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे गृहज्योती योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी आपली नोंदणी आणि कागदपत्रांबाबतची स्थिती संबंधित वीज कार्यालयाकडून तपासून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी आंदोलनाचा प्रल्हाद जोशींना धसका; हुबळीतील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त

Spread the love  हुबळी : ऊसाला योग्य दर, किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ आणि अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *