Friday , October 23 2026
Breaking News

ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला महत्त्वाचे वळण; २६ ऑक्टोबरला बेळगावात मुख्यमंत्र्यांची बैठक

Spread the love

 

प्रतिटन ५,५०० रुपये दराच्या मागणीवर चर्चा होणार; शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या भूमिकेकडे लक्ष

बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी २६ ऑक्टोबर रोजी बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेचे प्रदेशाध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी दिली.

चुनप्पा पुजारी यांनी यासंदर्भात व्हिडिओद्वारे माहिती दिली. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीबाबत माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारकडूनही बैठकीची माहिती देण्यात आली असून, मुख्यमंत्री ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांच्या मालकांशी चर्चा करणार आहेत.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कित्तूर येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दसरा सणानंतर शेतकरी आणि साखर कारखानदारांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता २६ ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.

कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार?

उसाच्या दरावरून शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या बैठकीत दराबाबत सहमती झाल्यास राज्यातील साखर कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. मात्र, उसाचा अंतिम दर किती निश्चित होणार आणि कारखाने कधी सुरू होणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, असे आवाहन चुनप्पा पुजारी यांनी केले आहे. २६ ऑक्टोबरच्या बैठकीत सरकार काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिटन ५,५०० रुपयांच्या दराची मागणी मान्य होणार का आणि साखर कारखाने सुरू होणार का, याचे उत्तर आता २६ ऑक्टोबरच्या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकरी आंदोलनाचा प्रल्हाद जोशींना धसका; हुबळीतील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त

Spread the love  हुबळी : ऊसाला योग्य दर, किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ आणि अन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *