


उत्सवापूर्वी प्रशासनाची धावपळ; कायमस्वरूपी दुरुस्ती आणि नवीन पुतळ्याची मागणी
बेळगाव : कित्तूर उत्सवाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याचा तलवार धारण केलेला उजवा हात तुटून पडल्याची घटना समोर आली होती. या घटनेची दखल घेत तालुका प्रशासन आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करत रात्रीतूनच तुटलेल्या हाताची तात्पुरती दुरुस्ती केली.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याचा हात तुटल्याने नागरिक आणि राणी चन्नम्मा यांच्या चाहत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. कित्तूर उत्सवाच्या तयारीला वेग आलेला असतानाच ही घटना घडल्याने पुतळ्याच्या देखभालीबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.
घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होताच प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशिरा तुटलेला हात तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आला. त्यामुळे उत्सवापूर्वी पुतळ्याला झालेली हानी तात्पुरती भरून काढण्यात आली आहे.
मात्र, ही दुरुस्ती तात्पुरती असल्याने पुतळ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, सध्याच्या पुतळ्याऐवजी राणी चन्नम्मा यांचा भव्य आणि नवीन पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही जोर धरत आहे. राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करून त्यांच्या स्मारकाची योग्य देखभाल करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta