


२५ ऑक्टोबरला खानापूर शहरात, तर २७ व २८ ऑक्टोबरला जांबोटी आणि नंदगडमध्ये जनजागृती
खानापूर : येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळादिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पत्रक वाटप मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारकापासून मोहिमेला सुरुवात होणार आहे.
या मोहिमेअंतर्गत खानापूर शहरासह आठवडी बाजारात जनजागृतीची पत्रके वाटण्यात येणार आहेत. तसेच २७ ऑक्टोबर रोजी जांबोटी आणि २८ ऑक्टोबर रोजी नंदगड येथे पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.
सीमाप्रश्नाबाबत जनजागृती करून काळादिनाचा संदेश घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमात समितीचे आजी-माजी पदाधिकारी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta